अमरावती : निसर्ग आणि मानवाचे नाते उलगडण्यासाठी ट्रेकिंग हे एक उत्तम माध्यम असून, त्यातून मिळणारा अनुभव हा खऱ्या अर्थाने जीवनाचे शिक्षण देणारा असतो, असे प्रतिपादन राज्यपाल नामीत व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू यांनी साहसी क्रीडा शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात केले. महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने दि. 7 ते 11 मार्च दरम्यान चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्था येथे राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. निलेश कडू, डॉ. राजेश जयपूरकर डॉ. जयंत वडतकर, सुप्रसिद्ध आर्किटेक्ट श्री. उमेश पाटणकर, श्री राघवेंद्र मुन व सौ. वंदना मुन तसेच पाचही जिल्ह्रांचे रा.से.यो. चे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
पाच दिवस चाललेल्या या साहसी क्रीडाशिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी विविध ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये विद्यार्थ्यांचा ऍडव्हेंचर प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग, सांस्कृतिक सहभाग , शिस्त व वागणूक आणि लेखी परीक्षा या प्रकारावर मूल्यांकन करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी उत्कृष्ट विद्यापीठ पुरस्कार पटकाविला , तसेच उत्कृष्ट संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. सचिन चव्हाण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व प्रा.अर्चना श्रीचिपा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . तर उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून प्रथमेश चाटे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी व रंजित जाधव मुंबई विद्यापीठ , कु. श्रुष्टि राणे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला , कु. पारुल तिवारी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई याचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच १९ विद्यापीठातील सहभागी कार्यक्रम अधिकऱ्यांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ऍडव्हेंचर हब चे मनीष ढाकुलकर व त्यांच्या संपूर्ण टीम चे देखील सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. रवींद्र कडू आपल्या भाषणात म्हणाले, मेळघाटातील जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या युवकांच्या तुकडीला मार्गदर्शन करताना त्यांनी निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. मेळघाटातील जंगलात आजही अशा अनेक वनस्पती आहेत, ज्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. संशोधकांसाठी हे क्षेत्र मोठे आव्हान आणि संधी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ट्रेकिंगमुळे व्यक्तीचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते. विकसित भारताकडे वाटचाल करताना युवकांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
नियोजन आणि सळसळते रक्तच घडवेल देशाची प्रगती – डॉ. निलेश कडू
अध्यक्षीय भाषण करतांना डॉ. निलेश कडू म्हणाले , दैनंदिन जीवनात शिस्त, केलेले नियोजन आणि युवकांमधील सळसळते रक्तच देशाच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक सुधारणेसाठी कारणीभूत ठरेल राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबिराच्या समारोपिय कार्यक्रमात व्यक्त केला. ते पुढे म्हणाले यशस्वी जीवनासाठी शांत डोक्याने विचार करून आपल्या कामाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही कार्यासाठी सळसळते रक्त असणारे उत्साही स्वयंसेवक ही देशाची मोठी ताकद आहेत. शिबिराच्या यशासाठी आयोजक आणि सहभागी दोघांचेही सहकार्य महत्त्वाचे असते.”विद्यार्थ्यांची साथ आणि आमचा प्रयत्न” यातूनच विकासाचे ध्येय गाठता येईल,
साहसी खेळांच्या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडणार – डॉ. जयंत वडतकर
विद्यार्थ्यांमध्ये साहसी वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना विविध खेळांची तांत्रिक माहिती देण्यासाठी चिखलदरा येथे पाच दिवसीय साहसी क्रीडा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी चिखलदऱ्याच्या या भूमीवर उपलब्ध असलेल्या भौगोलिक परिस्थितीचा वापर करून विद्यार्थ्यांना साहसी खेळांचे उत्कृष्ट प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपकरणांची ओळख आणि त्यांच्या वापराचे तंत्र आत्मसात केल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र पाहायला मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले
संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन, महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत आणि रासेयो लक्ष गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. शिबिराकरीता राज्यभरातील 19 विद्यापीठातील 98 विद्यार्थी व 15 संघ व्यवस्थापक सहभागी झाले आहेत. पाचही दिवसाचे अहवाल वाचन डॉ. विशाल गजभिये यांनी केलेसूत्रसंचालन डॉ. सुधीर कोहचाळे , तर आभार डॉ. विकास देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, स्वयंसेवक, संघ व्यवस्थापक, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

