यवतमाळ : वीज ग्राहकांना सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने वीज विषयक सर्व सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा लाभ घेत अमरावती परिमंडळातील वीज ग्राहकांनी चालू आर्थिक (२०२५-२६) वर्षात तब्बल ६ कोटी ७६ लाख रुपयाची सवलत मिळवली आहे.
महावितरणकडून ग्राहकांना वीज बिल वेळेत भरण्यासाठी तसेच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती दिल्या जातात. बिल जारी झाल्यानंतर सात दिवसांच्या आत वीज बिल भरल्यास बिल रकमेच्या (कर व शुल्क वगळून) १ टक्के तत्पर बिल भरणा सूट दिली जाते. तसेच नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट, कॅश कार्ड किंवा यूपीआय यांसारख्या डिजिटल माध्यमातून बिल भरल्यास ०.२५ टक्के डिजिटल बिल भरणा सूट दिल्या जाते. याशिवाय पर्यावरण पुरक ‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय स्वीकारून छापील बिलाऐवजी ई-मेलवर वीज बिल घेतल्यास दरमहा प्रति बिल १० रुपयांची सूट दिली जाते.
अमरावती परिमंडळातील २ लाख ६४ हजार ८२२ ग्राहकांनी चालू आर्थिक वर्षात तत्पर बिल भरणा सूट म्हणून ३ कोटी ६९ लाख ५ हजार रुपयाची सवलत मिळवली आहे, डिजिटल बिल भरण्याचा पर्याय स्विकारत परिमंडळातील २ लाख ५८ हजार ३४० ग्राहकांनी १ कोटी ५३ हजार २८४ रूपयाची सुट मिळवली आहे. तसेच १ लाख ४६ हजार ९९६ ग्राहकांनी गो ग्रीन पर्यायातून २ कोटी ६ लाख ४५ हजार ३०० रूपयाची सवलत मिळविली आहे.
परिमंडळातील जिल्हानिहाय आकडेवारी पाहता अमरावती जिल्ह्यातील १ लाख ७१ हजार ७३ ग्राहकांनी प्रॉम्ट पेमेंट (तत्पर बिल )भरण्याचा लाभ घेत २ कोटी ४८ लाख ८६ हजार रूपयाची सवलत मिळविली, १ लाख ५८ हजार ५५५ ग्राहक डिजिटली बिल भरत असल्यामुळे त्यांना ०.२५ टक्के प्रमाणे ६७ लाख ७५६ रूपयाची सवलत घेतली आहे. त्याचबरोबर गो ग्रीन योजनेतून ८६ हजार ४२८ ग्राहकांना १ कोटी २० लाख ६२ हजार रूपये कमावले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात तत्पर बिल भरून प्रति बिल १ टक्का सुट मिळविणारे ग्राहक ९३ हजार ७४९ असून त्यांना चालू आर्थीक वर्षात १ कोटी २० लाख १८ हजार ६३७ रूपयाची सवलत घेतली आहे. गो ग्रीन योजनेत सहभागी झालेल्या ६० हजार ५६८ ग्राहकांना ८५ लाख ८३ हजार २५० रूपयाची सवलत घेतली आहे, तर डिजिटली बिल भरून जिल्ह्यातील ९९ हजार ७८५ ग्राहकांना ३३ लाख ५२ हजार ५२८ रूपयाचा लाभ झाला आहे.
महावितरणच्या संकेतस्थळावर तसेच महावितरण ग्राहक मोबाईल ॲपद्वारे वीज बिल पाहणे व भरणे, तक्रार नोंदविणे, नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणे, वीज भार व नाव बदलणे यांसारख्या सर्व सेवा सुरक्षित, जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या वेळ, श्रम आणि पैशांची बचत होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर करून वेळेत ऑनलाईन वीज बिल भरावे तसेच ‘गो ग्रीन’ पर्याय स्वीकारावा, असे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे.

